About Me

माझं नांव गिरीश शाह.

व्यवसायाने कारखानदार. शैक्षणिक पात्रतेने मेकॅनिकल इंजीनियर आणि प्रॉडक्ट डिझाईनर.

सन 1996. नौकरी सोडून सरळ गावाला परतलो आणि वातीचा स्टोव्ह बनविण्याचा कारखाना सुरू केला – कारखाना चालविण्याचा काहीही अनुभव पाठीशी नसताना आणि जेमतेम 5-6 वर्षे नौकरी केल्यानंतर ! उद्योग सुरू केल्यानंतर अवघ्या 2 महिन्यातच कळून चुकले की घोडचूक केलेली आहे .

पॉवर प्रेस मशीन , प्रेसच्या डायी , सी आर सी पत्रा आणि कारखाना चालविणे अश्या पैलूंबद्दल फारशी माहिती नव्हती. राजकोट (गुजराथ) येथून काही मशीनी आणि 25-30 डाईंचा सेट खरेदी केल्या होत्या त्यामुळे तिथल्या लोकांशी फोनवर बोलून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत होतो . पण डाईंच्या दुरुस्ती साठी वरचेवर राजकोटला जावे लागत होते. हा सगळा आटापिटा करणे खर्चीक तर होतेच , वेळखाऊ पण होते. माझ्या गावात तर सोडा, लगतच्या नागपूर, अमरावती , अकोला यांसारख्या तुलनेने मोठ्या शहरांत सुद्धा चांगला जाणकार डाय मेकर मिळत नव्हता.

मी निर्धार केला की आपणच डायी बनवायच्या. ते ही आपल्याच कारखान्यात . मुंबई गाठली. डाय डिझाईन वर एक छान इंग्रजी पुस्तक, डाय बनविण्यासाठी लागणारी काही अवजारे आणि डाय साठीचे लोखंड खरेदी केले. पुस्तक वाचून डाय बनविण्याचे प्रयत्न सुरू केले .

सुरवातीला बरीच डोकेदुखी झाली , चुका झाल्या , आर्थिक नुकसान पण झाले. फाइलने लोखंड घासून घासून पुस्तकात लिहिल्याप्रमाणे प्रयत्न करीत राहिलो . 2-4 डायी व्यवस्थित बनल्या तर हुरूप आला . फक्त एक लेथ मशीन , एक ड्रिल मशीन , एक पुस्तक व काही आवश्यक अवजारे एवढ्या साहित्याच्या भरवशावर मी डाय डिझाईन शिकत होतो .

मला वाटते की मेकॅनिकल इंजीनीरिंगची / प्रॉडक्ट डिझाईनची विशिष्ठ विचार पद्धत आणि इंग्रजी भाषेवरची मजबूत पकड या दोन गोष्टींमुळे मी स्वताहूनच डाय डिझाईन शिकू शकलो. डाय मेकिंग पेक्षा डाय डिझाईन मला जास्त जमतं कारण की मी ITI मधनं कुठल्याही ट्रेड चे तांत्रिक प्रशिक्षण घेतलेले नाही.

उद्योजकच्या भूमिकेतल्या एवढ्या वर्षांच्या कारकिर्दीत मी आजपर्यंत अंदाजे 400 डायी बनविल्या असतील. मला लागणाऱ्या डायी मी माझ्या शॉप मधे बनवितो . वेळ असेल तेव्हा इतर ग्राहकांसाठी पण बनवितो . वेळ नसेल तेव्हा फक्त डिझाईन बनवून देतो .

मी blanking die, piercing die, draw die, compound die, combination die, embossing die, forming die , bending die, trimming die, assembly die, horn die, hand press die, shearing die, progressive die अश्या विविध प्रकारच्या डायी बनविल्या आहेत.

.माझी दोन्ही मुलं माझा हल्लीचा उद्योग करू इच्छित नाही आणि येत्या 2-3 वर्षांत रिटायर होण्याचा माझा मानस आहे. तेव्हा मनात असा विचार आला की आपण डाय डिझाईन वर एक ब्लॉग आतापासूनच सुरू करायला पाहिजे जेणेकरून निवृत्तीनंतर वेळ कसा घालवावा असा प्रश्न राहणार नाही . व्यस्त राहता येईल . डाय डिझाईन बद्दलचे ज्ञान शेअर करता येईल .

डाय डिझाईन वरची जी काही पुस्तके आणि माहिती नेट वर उपलब्ध आहेत ती प्रामुख्याने क्लिष्ट इंग्रजी भाषेत आहेत. टेक्निकल बॅकग्राऊंड नसणाऱ्या सामान्य लोकांसाठी , DIY (Do It Yourself) ची आवड असणाऱ्या लोकांसाठी ही पुस्तके उपयुक्त नाहीत . म्हणूनच मी हा ब्लॉग जेवढ्या भाषा मला येतात तेवढ्या भाषेत लिहिणार आहे .

या ब्लॉग चा मुख्य उद्देश्य असणार आहे टेक्निकल बॅकग्राऊंड नसणाऱ्या लोकांना डाय डिझाईन अगदी सोप्या भाषेत उलगडून सांगणे.

Email: stampingdesignblog@gmail.com